ग. दि. माडगूळकर

१४ डिसेंबर (१९७७) म्हणजे मृत्यूच्या पराभवाचा दिवस,कारण त्याच्या हाती लागला तो केवळ गदिमांचा नश्वर देह.....इतकी मोठी अंत्ययात्रा पुण्याने फार क्वचित बघितली असेल...त्यांच्या स्मृतीस अभिवादन करुन...

"तो राजहंस एक......"
........सुमित्र माडगूळकर

महाराष्ट्राच्या लोकजीवनात सुगंधासारखा शिरलेला एक प्रतिभासंपन्न साहित्यिक,कलाकार,मराठी माणूस ज्यांना 'गदिमा' या लाडक्या नावाने ओळखतो,जवळच्या मित्रांचे 'अण्णा' तर आम्हा नातवंडांचे 'पपा आजोबा' अर्थातच गीतरामायणकार महाकवी ग.दि.माडगूळकर!.

"एका तळ्यात होती बदके पिले सुरेख,होते कुरुप वेडे पिल्लु तयात एक.... "
गदिमांचे एक सुंदर गीत,आपल्या प्रत्येकात एक कुरुप पिल्लू दडलेले आहे,आपण डावलले जातो आहोत ही भावना कधी न कधी आपल्या आयुष्यात कुरुप बदकाच्या पिल्लाच्या रुपाने भावतरंगातून मान नक्कीच वर काढते.

आपल्यातला राजहंस गदिमांनी ओळखला होता,गदिमांचा जन्म अठराविश्व दारिद्र्य असलेल्या एका गरीब कुलकर्णी परिवारात झाला,आटपाडी जवळचे माडगूळे हे गदिमांचे गाव,वडिल औंध संस्थानात कारकून होते,गदिमांचे आजोबा मोठे कर्तुत्ववान,ते मरताना गदिमांच्या आईला सांगून गेले "बाळ,यापुढे काळ कठीण आहे,तुझा नवरा साधू-संत आहे,आज मिर्ची आणली तर चार दिवसांनी मीठ आणेल...तुलाच यापुढे खंबिर व्हायला हवे..." झालेही तसेच,अठराविश्व दारिद्र्य गदिमांची वाटच पहात होते,न देवाने रुप दिले होते न आर्थिक सुबत्ता,दहावीत गणिताने घात केला व पुढे शिकावे इतका पैसा व बळ ही त्यांच्या जवळ नव्हते पण एक दिवस घडलेल्या प्रसंगाने त्यांच्यातला राजहंस जागा झाला.

गदिमांच्या वडलांची 'कुडंल' या गावी बदली झाली होती,गावात पाण्याचे प्रचंड दुर्भिक्ष्य,गावाजवळच्या ओढ्यामधून पाणी भरुन आणायला लागायचे,गदिमांनी कुमार वयात प्रवेश केला होता,अर्धवट वय ज्यावेळी,मनात एक धगधग असते,अन्याय-गरीबी,जग सगळ्यां विषयी एक विचित्र पेटती भावना मनात उत्पन्न होत असते,याच वयात एक दिवस गदिमा असेच गावातल्या पोरांबरोबर हुंदडत चालले होते,समोरुन ओढयावरुन कळशीत पाणीभरुन त्यांचे वडिल घराकडे चालले होते,त्यांना दम्याच्या त्रास होता,धापा टाकतच ते चालले होते....

गदिमांनी ते बघितले व त्यांचा राग मस्तकात गेला,तावातावाने ते वडिलांजवळ गेले व कळशी त्यांचा हातातून ओढून घेतली,तसेच तडक घरी गेले,कळशी ठेवली,व घरातले प्रत्येक भांड न भांड त्यांनी ओढ्यावरुन पाणी आणून भरायला सुरवात केली,अगदी वाटी-पेल्यांपर्यंत सर्व भरुन झाले,गदिमांची आई हे सर्व बघत होती ती हसुन म्हणाली

"अरे अण्णा,आता देवाची पळी तेव्हडी भरायची राहिली रे,तुझे वडील पाणी भरत होते तर पुरत नव्हते,आज तु पाणी आणलेस तर घरात पाणी ठेवायला जागा राहीली नाही...."

आईच्या बोलण्यातली सुचकता गदिमांनी अचूक ओळखली,आपले वडिल आता थकले आहेत,संसाराचा भार त्यांना एकट्याला पेलवत नाहीये आपल्यालाही आता काहीतरी करायला हवे याची जाणीव त्यांना झाली व वयाच्या केवळ १७-१८ व्यावर्षी ते घर सोडून पुढच्या वाटचालीसाठी कोल्हापूरला चित्रपटसृष्टीत आले.

पुढे काही दिवसांनी गदिमांच्या वडिलांची कुंडल गावावरुन बदली झाली,त्याकाळात बैलगाड्यांवरुन सामान नेत असत,कुलकर्णी कुटुंब आवरा-आवरी करुन निघाले पण गावातल्या लोकांनी गाड्या अडवून धरल्या,गावात देणी खूप झाली होती,व ती फेडल्याशीवाय जायचे नाही असे सावकार लोक सांगत होते,मोठी पंचाईत झाली,गदिमांच्या आईने छोट्या व्यंकटेश (गदिमांचे धाकटे बंधू व्यंकटेश माडगूळकर) ला सांगीतले
"अण्णा ला पत्र पाठवून बोलावून घे",

त्यांनी गदिमांना पत्र लिहीले,छोटा व्यंकटेश दररोज संध्याकाळी एसटीच्या वाटेवर डोळे लाऊन आपल्या भावाची वाट पहायचा,त्याला खात्री होती आपला आण्णा येईल व आपल्याला संकटातून सोडवेल,३-४ दिवस झाले व एके संध्यांकाळी आपल्या लाडक्या अण्णाची सावळी आकृती दुरुन येताना दिसली.गदिमा आले व त्यांनी गावातली सर्व देणी एकहाती देऊन टाकली व गदिमांच्या कुटुंबाच्या गाड्या कुंडल गावातून बाहेर पडल्या.

काही दिवसांपूर्वी तावातावाने वडीलांच्या हातून कळशी घेणार्या गदिमांच्यातल्या कुरुप पिल्लाचा आज राजहंस झाला होता,याच राजहंसाने पुढे मराठी साहित्यात व मराठी चित्रपटसृष्टीत एक स्वता:चे अनभिषक्त सम्राटपद निर्माण केले,

"ज्योतीने तेजाची आरती" या उक्ती नुसार वरवर त्यांच्या कार्याचा फक्त आढावा घ्यायचा झाला तर...
मराठी चित्रपटांसाठी त्यांनी १५७ पटकथा तर २००० पेक्षा जास्त मराठी गाणी लिहिली, त्यांच्या गाजलेल्या चित्रपटांमध्ये 'रामजोशी','वंदे मातरम,'पुढचे पाऊल','गुळाचा गणपती','लाखाची गोष्ट','पेडगावचे शहाणे','ऊनपाऊस','सुवासिनी','जगाच्या पाठीवर','प्रपंच', 'मुंबईचा जावई','देवबाप्पा' सारख्या उत्तमोत्तम चित्रपटांचा समावेश होता,गदिमा-सुधीर फडके-राजा परांजपे या त्रयीने तर मराठी चित्रपटांचा सुवर्णकाळ निर्माण केला.

हिंदी चित्रपटसृष्टीतही २५ पटकथा लिहून गदिमांनी आपला ठसा उमटवला,व्ही.शांताराम यांचा 'दो आंखे बारह हाथ','नवरंग','गूंज ऊठी शहनाई','तूफान और दिया' हे चित्रपट गदिमांचेच!.अगदी गुरुदत्त च्या 'प्यासा' ची मूळ कथा असो,राजेश खन्ना चा 'अवतार' असो वा अलिकडचा अमिताभ बच्चन चा 'ब्लॅक',मूळ संकल्पना गदिमांच्याच लेखणीतून ऊतरलेली होती.हिंदीतल्या अनेक चित्रपटांना गदिमांच्या कथेचा आधार घ्यावा लागला होता-आहे.

मराठी साहित्यात गदिमांनी कवी,कथालेखक, कादंबरीकार, नाटककार,संपादक अशा सर्व क्षेत्रात वावर केला जवळजवळ ३७ पुस्तके गदिमांच्या नावावर आहेत,प्रत्येक चित्रपटाची कथा ही कादंबरीच असते,गदिमांनी अशा १५७ पटकथा लिहील्या त्यांची जर पुस्तके काढली तर गदिमांच्या नावावर २०० पेक्षा जास्त साहित्यकृती जमा होतील!

गदिमांनी स्चातंत्रलढयातही भाग घेतला होता,खूप मोठया कुटुंबाची जवाबदारी,त्यात अठराविश्वे दारिद्र यामुळे गदिमांनी स्वातंत्र लढयात प्रत्यक्ष उडी न घेता शाहिरी कवने,पोवाडे लिहून जनजागृती केली,सातारा-सांगली भागात प्रतिसरकारचा प्रचार करण्यासाठी शाहिर निकमांसारख्यांनी त्याकाळात गदिमांची कवने गाऊन स्वातंत्र्य लढ्यात रान ऊठवले होते.गदिमांनी राजकारणासारख्या कोरडया क्षेत्रातही मुक्त वावर केला,ते साहित्यिकांचे प्रतिनिधि म्हणून जवळजवळ १२ वर्षे विधान परिषदेचे नामनियुक्त सदस्य (आमदार) होते.ते जेव्हा विधान परिषदेत भाषण करणार असायचे तेव्हा ते ऐकण्यासाठी विधान सभेतील अनेक आमदार खास त्याचे भाषण ऐकण्यासाठी विधान परिषदेत येऊन बसत असत.

गदिमांना 'महाकवी' व 'आधुनिक वाल्मीकी' ही पदवी ज्याच्या मुळे प्राप्त झाली ते महाकाव्य गीतरामायण,'गीत रामायण' हा एकाच कवीने वर्षभर रचलेला, एकाच संगीतकाराने संगीतबद्ध केलेला, वर्षभर अखंडितपणे चाललेला आकाशवाणीच्या इतिहासातील एकमेव, अभूतपूर्व असा संगीत कार्यक्रम ठरला १ एप्रिल १९५५ ते १९ एप्रिल १९५६ पर्यंत तो पुणे आकाशवाणीने प्रसारित केला.गीतरामायणाचे आजपर्यंत हिंदी, गुजराथी, कन्नड, बंगाली, आसामी भाषा, तेलगु, मल्याळी, संस्कृत,कोकणी अशा विविध भारतीय भाषांमध्ये भाषांतर झालेले आहे.गदिमांनी श्रीकृष्ण चरित्रावर लिहिलेले 'गीतगोपालही' गीतरामायणाच्या तोडीस तोड आहे.पुरस्काराच्या बाबतीत तर गदिमांची 'देता घेशील किती दोन करांनी तू' अशी अवस्था व्हायची.

१४ डिसेंबर १९७७ म्हणजे मृत्यूच्या पराभवाचा दिवस,कारण त्याच्या हाती लागला तो केवळ गदिमांचा नश्वर देह,इतकी मोठी अंत्ययात्रा पुण्याने फार क्वचित बघितली असेल,स्त्री-पुरुष,वृध्द,राजकारणी,कलावंत,अगदी दप्तर-पुस्तके घेतलेल्या लहान मुलांपासून सर्वजण त्यात सामील झाले होते,अनेक घरात त्या दिवशी चुली पेटल्या नाहीत कारण गदिमा हे त्यांना त्यांच्या घरातलेच एक वाटत होते.गदिमांना केवळ ५८ वर्षाचे आयुष्य लाभले तरी ते आजही त्यांच्या असंख्य गाण्यांतून,साहित्यातून,चित्रपटातून,गीतरामायणातून मराठी रसिकांच्या ह्रदयात विराजमान आहेत.

'मराठी माणसाच्या ह्रदयात जेथे पवित्र व सुंदर गोष्टी वास करतात तेथे गदिमांचे स्थान आहे'.

सुमित्र माडगूळकर
(गदिमांचे नातू)

Comments

Popular posts from this blog

अष्टदिशा माहिती

Short film reviews film by sairaj