शैलजा वायझाडे यांची कविता

"बा"

पेपराच्या रद्दीमंदी 'बा' सपनं माही पाहे...

जवा माह्या जल्माचे डोहाळे लागले माह्या मायले
तव्हा 'बा'ले सपान लागले मोठ्ठे, मोठ्ठे यायले
सपना मंदी दिसे त्याले लेक कलेक्टर
धुळला उडवत ताफ्यासंग  दारात मोटार
मोटारीतून लेक असा तोऱ्यात उतरू जाये
तव्हा पेपराच्या रद्दीमंदी 'बा' सपनं माही पाहे...ll1ll

'बा'ले सापडला रद्दीमंदी खजिना जवा
मले शिकवन्याचा गावला रस्ता जुन्यातून नवा
आशेले तव्हा फुटला त्याच्या अंकुर हिरवा
उन्हातान्हात न्हाई केली त्यानं जीवाची पर्वा
दिसामागून दिस असे सरता सरून जाये
तव्हा पेपराच्या रद्दीमंदी 'बा' सपनं माही पाहे...ll2ll

झोपडीमंदी सूर्य, चंद्र  ढुकून ढुकून पाहती
भविष्यासाठी आशिर्वाद देत गोंजारून जाती
उघड्या दारातून वारा पलटवे पुस्तकाची पानं
घुबडं, वाघूळे, निशाचर गाती सुरेल गानं
झोपला माह्या चेहरा पाहून 'बा' गहिवरून जाये
तव्हा पेपराच्या रद्दीमंदी 'बा' सपनं माही पाहे...ll3ll

दारोदार गल्लीबोळा वनवन फिरे  बाप
'हाये का जुन्या पेपर, पुस्तकाची रद्दी' देऊन हाक
आरडून, वरडून घसा त्याचा फाटून लई जाये
फाटल्या घशामंधी सपनं नवी आस घिऊन वाहे
उकरून काढण्या भविष्य त्याचा श्वास फुलून जाये
तव्हा पेपराच्या रद्दीमंदी 'बा' सपनं माही पाहे...ll4ll

M.P.S.C... U.P.S.C. ..कधी परिपाठ
पान अन् पान चाळून सजवे भविष्याच ताट
दिन महात्म्य असे कधी चरित्र महात्म्याचं
राखून ठेवे पानं जसं ....शरीर आत्म्याचं
रोज नव्या... रोजsss नव्या...रोज नव्या साहित्याची रास राशीवर  चढत जाये
तव्हा पेपराच्या रद्दीमंदी 'बा' सपनं माही पाहे...ll5ll

किती सांगू वाट्टे मले 'बा'चा  अभिमान
कलेक्टर झालो,  केला 'बा'चा पयला मान
'बा'च माही जान,.. अन् 'बा'च माही शान
माह्या साठी हाय तो सार्‍या जगाहून महान
महानतेचा धागा असा घट्ट ईनला जाये
जवा पेपराच्या रद्दी मंधी 'बा' सपनं माही पाहे...ll6ll

Shail...

शैलजा वायझाडे,

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

अष्टदिशा माहिती

ग. दि. माडगूळकर

Short film reviews film by sairaj